पुणे : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता बदलापूरमधील घटनेने महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये आणि इतरही मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील पालक वर्गाकडून या विषयी संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
advertisement
आपल्या मुली शाळेत जाताना तरी सुरक्षित असतात का, अशी काळजी त्यांना वाटू लागली आहे. रस्त्यावर टवाळखोर मुलांचा उन्माद सुरू आहे. त्याकडे पोलीस प्रशासन कधी लक्ष घालणार, अशा विनवण्या करू लागले आहेत. लोकल18 च्या प्रतिनिधीने पुण्यातील काही महिलांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी सांगितले की, आपल्या मुली या आता शाळेतही सुरक्षित नाहीत. त्याचबरोबर शाळकरी मुली या शाळेत जाताना रिक्षा किंव्हा टॅक्सीद्वारे जात असतात. त्यामध्ये 4 पेक्षा अनेक पॅसेंजर रिक्षात बसवल्याने मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले जाते. शाळेमध्ये महिला कर्मचारी मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात याव्या, अशी मागणीही त्यांनी केली.
अशा स्वरूपाच्या घटना कानावर आल्यानंतर आम्ही पालक दिवसभर कामावर असतो. त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची काळजी लागून राहते. ही घटना ऐकल्यापासून आपल्या मुलींबद्दल प्रचंड काळजी वाटत असल्याचे, या महिलांनी म्हटले आहे.
एकंदरीतच काय तर शाळा आणि महाविद्यालये सारखी ठिकाणेही स्त्रियांना सुरक्षित वातावरणाची हमी देत नाहीत. यामुळे कुटुंबांना त्यांच्या सुरक्षिततेची शंका वाटते. कारण त्यांची सुरक्षा त्यांच्या शिक्षणापेक्षा जास्त महत्त्वाची आहे, असे पालकांनी म्हटले आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता, पालक चिंतेत असून मुलींच्या सुरक्षिततेची कुठेही शाश्वती नाही, अगदी शाळा-कॉलेजसारख्या शैक्षणिक संस्थांमध्येही नाही. असे या प्रकरणातून पुढे आले आहे.