राणी विशाल गायकवाड (वय 26, रा. वाकड) असं खून झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. राणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी 26 नोव्हेंबर रोजी वाकड पोलिसांत दाखल केली होती. सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख यांच्या पथकाने राणीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण सुरू केलं. तपासामध्ये राणी सातत्याने कॅब चालक अनिकेत कांबळेच्या संपर्कात असल्याचं आणि तो बार्शी-लातूर भागात गेल्याचं समोर आलं. पोलिसांनी सापळा रचून अनिकेतला ताब्यात घेतलं. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
राणी विवाहित असून तिला मुले आहेत, तसेच आरोपी अनिकेत कांबळे हा देखील विवाहित असून त्याला मुले आहेत. कुटुंबाला प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर राणीने पती आणि मुलांना सोडून अनिकेतसोबत राहण्याचा हट्ट धरला. मात्र, अनिकेत यासाठी तयार नव्हता. या हट्टामुळे कंटाळलेल्या अनिकेतने राणीचा काटा काढण्याचे ठरवले. बुधवारी त्याने राणीला गावी नेऊन ठेवतो, असे सांगून सोबत घेतले. ते दोघे धाराशिव जिल्ह्यातील बार्शी-लातूर रस्त्यावरील ढोकी गावाजवळ पोहोचले. तिथे अनिकेतने तिचा गळा आवळला आणि लोखंडी पाइपने तिच्या डोक्यावर वार करून तिचा खून केला.
गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेहावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. दुसऱ्याच दिवशी, २७ नोव्हेंबरला सकाळी ढोकी गावाजवळ हा अनोळखी मृतदेह स्थानिक पोलिसांना आढळला आणि त्याबद्दल ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, गुन्हे निरीक्षक किशोर पाटील आणि तपास पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या गुन्ह्याचा छडा लागला.
