वरिष्ठांवर छळाचे गंभीर आरोप
बेपत्ता होण्यापूर्वी निखिल रणदिवे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर एक भावनिक मेसेज लिहिला होता. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वागणुकीवर गंभीर आरोप केले होते. गेल्या वर्षभरापासून वरिष्ठांचा सततचा मानसिक छळ, मनमानी आदेश, वारंवार दूरस्थ ठिकाणी ड्युटी, आजारी मुलीला वेळ न देता येणे आणि नुकत्याच झालेल्या शिक्रापूर बदलीतील रिलीव्हिंगमध्ये झालेला विलंब, यामुळे आपण प्रचंड तणावात आहोत, असं त्यांनी म्हटलं होतं.
advertisement
पाच दिवसानंतर शोधमोहीम थांबली
रणदिवे यांनी ही पोस्ट केल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला होता आणि ते बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी तातडीने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर यवत, शिक्रापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने निखिल रणदिवे यांचा युद्धपातळीवर शोध सुरू केला होता. त्यांच्या शोधासाठी पाच पथकं रवाना केली होती. मात्र बुधवारी रात्री ते सुखरुप घरी परतले.
आता चौकशीची मागणी
निखिल रणदिवे परतले असले तरी, त्यांनी वरिष्ठांवर केलेले मानसिक छळाचे गंभीर आरोप आता पोलीस दलासाठी डोकेदुखी ठरले आहेत. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याविरुद्ध यापूर्वीही काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्याच्या चर्चा आहे. त्यांच्या कारभाराबाबत ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. आता या प्रकरणाची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
