महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार (बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट) वैध परवाना असलेल्यांनाच मद्यपानाची मुभा आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात विशेष तपास मोहीम राबविण्यात येणार असून, परवाना नसताना मद्यपान, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि वाहतूक पोलिस संयुक्तपणे ही मोहीम राबवणार आहेत.
advertisement
Bhima Koregaon: भीमा-कोरेगावला जाताय? ‘या’ मार्गावर प्रवास मोफत, ‘PMP’ची मोठी घोषणा
दारू पिण्याचा परवाना कसा आणि कुठे काढायचा?
दारू पिण्याचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दिला जातो. नागरिकांना दोन प्रकारचे परवाने उपलब्ध आहेत—आजीवन परवाना आणि वैद्यकीय कारणासाठीचा अल्पकालीन परवाना. परवान्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतो किंवा जवळच्या उत्पादन शुल्क कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येतो. अर्जासोबत ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, वैद्यकीय प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) आणि निर्धारित शुल्क भरावे लागते. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर परवाना जारी केला जातो.
कारवाईची तयारी
नववर्षाच्या रात्री शहरातील प्रमुख चौक, पार्टी झोन, हॉटेल परिसरात नाकाबंदी करण्यात येणार आहे. मद्यधुंद वाहनचालकांवर ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपास केला जाणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर दंड, परवाना जप्ती, वाहन जप्ती किंवा गुन्हा दाखल करण्याची कारवाई होऊ शकते. तसेच, अल्पवयीनांना मद्यपुरवठा करणाऱ्यांवरही कठोर पावले उचलली जाणार आहेत.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, नववर्षाचे स्वागत आनंदात करा मात्र नियमांचे पालन करा. वैध परवाना असल्याची खात्री करा, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नका आणि सार्वजनिक सुरक्षिततेला प्राधान्य द्या.






