सुरूवातीला डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा खुल्या ठिकाणी घेण्याचं ठरलं होतं, पण वॉशिंग्टनमधल्या कॅपिटल रोटुंडा हॉलमध्ये ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. एलन मस्क, मार्क झुकेरबर्ग आणि जेफ बेजोस या जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होत्या. याशिवाय ऍपलचे सीईओ टीम कुक, टिकटॉकचे सीईओ शौ च्यु यांनीही या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावली.
advertisement
कोण आहेत आशिष जैन?
या शपथविधी सोहळ्याआधी पुण्याच्या व्यावसायिकाने डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. 19 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा मुलगा एरिक ट्रम्प यांनी खास डिनरचं आयोजन केलं होतं. या डिनरला पुण्याचे व्यावसायिक आशिष जैन उपस्थित होते. आशिष जैन हे पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील कुंदन स्पेस या कंपनीचे डायरेक्टर आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा मुलगा एरिक ट्रम्प यांनी एका खासगी सोहळ्याचं आयोजन केलं होतं, ज्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानीदेखील सहभागी झाले होते. आशिष जैन यांनी एमेझॉनचे संस्थापक जेफ बेसोज आणि एरिक ट्रम्प यांचीही भेट घेतली.
कार्डिफ बिजनेस स्कुलमधून शिक्षण घेतलेल्या आशिष जैन यांनी मागच्या 2 दशकांपासून भारतातल्या बांधकाम क्षेत्रात काम केलं आहे. आशिष जैन यांच्या कुंदन स्पेस कंपनीने बांधकाम क्षेत्रात मोठं नाव कमावलं आहे.
