पुणे : पुण्यात काल जे घडले, ती परिस्थिती मन हेलावणारी होती. मुसळधार पावसामुळे कुणाच्या घरात पाणी गेले, तर कुणाच्या अन्नधान्याचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. पुणेकरांनी जे सोसलं ते कदाचित त्यांच्यासाठीही अनपेक्षितच असावं.
पुण्यातील पूर-परिस्थितीमुळे काही नागरिकांना आहे तशा अवस्थेत आपलं घर सोडावं लागलं. तर काहींना घरात शिरलेल्या गुडघ्याभर पाण्यातच राहावं लागलं. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचे प्रचंड हाल झाले. ज्यांना आपली घरं सोडावी लागली त्यांच्या मनात घराच्या आठवणीने काय काहुर माजले असेल, याची कल्पनाही करता येणार नाही.
advertisement
काहीजण आपण आणि आपली माणसं एकत्र , सुखरुप आहोत यातच समाधान मानत असतील. पुण्यातील या एका दिवसात किती जणांच्या संसार, घर , कुटुंबाची वाताहात झाली हे सांगता येणं कठीण आहे.
पुण्यात बुधवारी रात्री रिमझिम पडणाऱ्या पावसाने गुरुवारी सकाळी रुद्ररूप धारण केले. खडवासला धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आणि पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा तंतोतंत खरा ठरला.
पुण्यातील भिडे पूल, सिंहगड रोड या ठिकाणी गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. बघता बघता या पाण्याची पातळी 5 फुटापर्यंत गेली. प्रशासनाच्या खबरदारीमुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. परंतु वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुणे परिसरातील अनेक धार्मिक स्थळे पाण्याखाली गेली.
गेल्या 32 वर्षात असा पाऊस पडला नाही, जो पुणेकरांनी 24 तासात अनुभवला. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यासाठी येणाऱ्या 24 तासांसाठी रेड अलर्ट कायम आहे.
शहरात घुसले पाणी, काय आहे कोल्हापुरातील पुराची सद्य परिस्थिती? नागरिकांना दिलासा मिळणार का? VIDEO
पुण्यातील पूरस्थिती पाहता अनेक नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अद्यापही मदत पोहचली नसल्याचं चित्र आहे. पाण्यात वाहून गेलेले अनेक संसार उघड्यावर आले आहेत. वेगवेगळ्या लोकांनी या नागरिकांना मदतीचे आश्वासन देखील दिले आहे. मात्र, आश्वासन नको मदत करा, अशी हाक जनमानसातून दिली जात आहे.