नेमकी घटना काय?
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी आणि शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक चंदननगर परिसरात गस्त घालत असताना, त्यांना मांजरी येथील एका तरुणाकडे हत्यार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून वेदांत सोसायटीजवळ आदित्य ढसाळ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या पँटमध्ये खोचलेले ५२ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि दोन काडतुसे सापडली.
advertisement
पिस्तुल खरेदीचे कारण ऐकून पोलीसही चकित: आदित्य ढसाळ याची वाद्य विक्रीची दोन दुकाने आहेत. पोलिसांच्या चौकशीत त्याने पिस्तुल बाळगण्याबाबत धक्कादायक कारण सांगितले. त्याच्या सोसायटीत नुकतीच काही लोकांमध्ये जोरदार भांडणे झाली होती. "भविष्यात आपली कोणाशी भांडणे झाली, तर स्वरक्षणासाठी शस्त्र जवळ हवे," या भीतीपोटी त्याने रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराकडून हे पिस्तुल खरेदी केले होते.
स्वरक्षणाच्या नावाखाली बेकायदेशीर शस्त्र बाळगणे हा गंभीर गुन्हा असून, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे पिस्तुल त्याला कोणाकडून मिळाले आणि याचा काही मोठा कट होता का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
