नेमकी घटना काय?
फिर्यादी मयूर अशोक लोखंडे (वय ३०) हे आकुर्डी परिसरातील दत्तवाडीत राहतात आणि त्यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी (१३ जानेवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास मयूर रावेत येथील एका चहाच्या टपरीवर बसले होते. यावेळी आरोपी विनोद ऊर्फ विन्या गायकवाड तिथे आला. त्याने मयूर यांना उद्देशून, "तू खूप पैसे कमावतोस, तुला इथे धंदा करायचा असेल तर ५० रुपये द्यावे लागतील," अशी मागणी केली.
advertisement
गाडी अंगावर घालून खुनाचा प्रयत्न: मयूर यांनी ही ५० रुपयांची खंडणी देण्यास स्पष्ट नकार दिला. या रागातून विनोद गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी मयूर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी मयूर यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मयूर गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी मयूर लोखंडे यांनी बुधवारी (१४ जानेवारी) रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विनोद ऊर्फ विन्या गायकवाड, अक्षय प्रभाकर साबळे आणि भूषण भोसले या तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ रकमेसाठी गुन्हेगारांनी इतके टोकाचे पाऊल उचलल्यामुळे रावेत परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
