ही कारवाई सोमवारी (१२ जानेवारी) दुपारी पावणे चारच्या सुमारास भोसरीतील मोहननगर परिसरात करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस हवालदार सोमनाथ बोऱ्हाडे आणि त्यांचे पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी एका मुलाच्या हालचाली अत्यंत संशयास्पद दिसून आल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल मिळून आले.
advertisement
जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाची किंमत साधारण ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड आणि उपनगरांमध्ये अवैध पिस्तुलांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आता अल्पवयीन मुलांचा वापर अशा शस्त्रांच्या वाहतुकीसाठी किंवा गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जात असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.
मास्टरमाईंडचा शोध सुरू: याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, इतक्या लहान मुलाला हे पिस्तूल कोणी पुरवले? शहरात ही शस्त्रे कोठून येत आहेत? आणि यामागचा मुख्य सूत्रधार किंवा 'मास्टरमाईंड' कोण आहे, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. या प्रकरणातील मूळ आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
