पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यात अजून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 17 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरोपींनी एका मुलीच्या नावाने संपर्क साधत संबंधित मुलाला कात्रज परिसरात बोलावल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
अमनसिंग गच्चड असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. या प्रकरणात प्रथमेश आढळ (वय 19) आणि नागेश धबाले (वय 19) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून अमन सिंगसोबत संपर्क साधून त्याला कात्रज परिसरात बोलावले. त्यानंतर त्याला खेड शिवापूर परिसरात नेण्यात आले. तेथे दगड तसेच धारदार शस्त्राने वार करून अमनसिंगची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
हत्या करण्यामागचं नेमकं कारण काय ?
अमनसिंग गच्चड हा 29 डिसेंबर 2025 रोजी दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला होता. मात्र तो घरी परतला नाही. बराच वेळ उलटूनही अमनसिंगचा काहीही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी 31 डिसेंबर 2025 रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. अमनसिंगच्या मोबाईलच्या कॉल रेकॉर्ड आणि लोकेशनच्या आधारे शोध घेण्यात आला. या तपासात अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून आरोपींनी अमनसिंगचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
