मैत्री ते विश्वासघाताचा प्रवास: मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, आरोपीचे दुसऱ्या एका तरुणीशीही प्रेमसंबंध असल्याची माहिती पीडितेला समजली. त्या दुसऱ्या तरुणीनेच पीडितेशी संपर्क साधून हे सत्य सांगितले. यामुळे पीडितेने आरोपीशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले.
ब्रेकअप झाल्याचा राग मनात धरून आरोपीने पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली. "आपले काही खाजगी फोटो माझ्याकडे आहेत, ते डिलीट करण्यासाठी तुला मला भेटावे लागेल," असे सांगून त्याने पीडितेला २९ डिसेंबर २०२५ रोजी तारकापूर बसस्थानकावर बोलावले. तिथे तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तो पुणे जिल्ह्याच्या दिशेने निघाला.
advertisement
आरोपीने पीडितेला लग्नाचे खोटे आमिष दाखवले आणि तिला आळंदी आणि मुळशी येथील नातेवाईकांच्या घरी नेले. तिथे त्याने तिला एका कागदावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. "हा कागद आपण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याबाबतचा आहे," असे सांगून तिची फसवणूक केली. त्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी त्याने तिच्यावर अत्याचार केला.
या त्रासाला कंटाळून तरुणीने तोफखाना पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे सोशल मीडियावरील मैत्री आणि ओळखीच्या धोक्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.
