नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश तराळे आणि आरोपी विजय वाघमारे या दोघांवरही आधीचे गुन्हे दाखल आहेत. आकाशने आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर विजयच्या प्रतिस्पर्धी टोळीतील 'साबळे' नावाच्या व्यक्तीचा फोटो ठेवला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून विजयने गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास खराडीतील स्वीट इंडिया चौकात आकाशला गाठले. "तू प्रतिस्पर्धी टोळीच्या माणसाचे फोटो स्टेटसवर का ठेवतोस? तुला मस्ती आली आहे का?" असे म्हणत विजयने आकाशशी वाद घालण्यास सुरुवात केली.
advertisement
यावेळी आकाशचा मित्र अमित भोसले याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि विजयने रागाच्या भरात आधी आकाशच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. त्यानंतर क्रूरतेचा कळस गाठत त्याने जमिनीवर पडलेल्या आकाशच्या डोक्यात मोठा दगड घातला. गंभीर जखमी अवस्थेत आकाशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार होण्याच्या तयारीत असलेल्या विजय वाघमारेला पोलिसांनी काही वेळातच बेड्या ठोकल्या. सोशल मीडियावरील किरकोळ वादातून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांमध्ये होणारी ही हिंसा पुणेकरांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.
