नेमकी कारवाई कशी झाली?
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला सोमवारी (१२ जानेवारी) दुपारी एक महत्त्वाची माहिती मिळाली. पिंपरीतील भाटनगर परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने दुपारी साडेबाराच्या सुमारास परिसरात सापळा रचला.
advertisement
पोलिसांनी संशयावरून ताराचंद मलकेकर (वय ६७, रा. भाटनगर, पिंपरी) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला १०० ग्रॅम गांजा सापडला, ज्याची बाजारपेठेत किंमत सुमारे पाच हजार रुपये आहे. या तपासात एका महिलेचाही सहभाग निष्पन्न झाल्याने तिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी अमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. हा गांजा त्यांनी कोठून आणला होता आणि ते शहरात कोणाला विक्री करणार होते, याचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाचा अशा अवैध व्यवसायात सहभाग आढळल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
