Maval Theft: साखर झोपेतच संपूर्ण कुटुंब संपवलं; अख्खा पुणे जिल्हा हादरवणाऱ्या त्या 'मावळ दरोडा' प्रकरणात मोठा निकाल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दरोड्याला प्रतिकार करताना आरोपींनी नथू फाले, त्यांच्या पत्नी छबाबाई फाले आणि मुलगा अभिनंदन फाले यांची हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला.
(गणेश दुडम, प्रतिनिधी) मावळ : मावळ तालुक्यातील धामणे येथील बहुचर्चित आणि संवेदनशील फाले कुटुंब तिहेरी हत्याकांडाचा निकाल तब्बल ८ वर्षांनंतर लागला आहे. सशस्त्र दरोडा टाकून आई, वडील आणि मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या १० अट्टल गुन्हेगारांना वडगाव मावळ सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काय होतं प्रकरण?
सन २०१७ मध्ये मावळातील धामणे गावात नथू विठोबा फाले यांचे कुटुंब शेतातील कामं उरकून रात्री झोपलेलं असताना, दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. दरोड्याला प्रतिकार करताना आरोपींनी नथू फाले, त्यांच्या पत्नी छबाबाई फाले आणि मुलगा अभिनंदन फाले यांची हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुका हादरून गेला होता.
advertisement
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी मुगुट पाटील यांनी अत्यंत कौशल्याने केला होता. गुन्हेगार कितीही धूर्त असले तरी तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षींच्या आधारे पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या केसचा पाठपुरावा करण्यात आला.
न्यायालयाचा निकाल: जिल्हा व सत्र न्यायालय वडगाव मावळचे माननीय न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी या प्रकरणातील भीषणता लक्षात घेऊन १० आरोपींना दोषी ठरवलं. सर्व १० आरोपींना एकत्रितपणे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावं नागेश उर्फ नाग्या भोसले, छोट्या उर्फ बापू काळे, बाब्या उर्फ भेन्या चव्हाण, सेवन उर्फ डेंग्या लाभ, दिलीप चव्हाण, सुपार उर्फ सुपर्या चव्हाण, राजू शिंगाड, अजय पवार, योगेश भोसले, दीपक भोसले, अशी आहेत.
advertisement
या निकालानंतर पीडित कुटुंबाला उशिरा का होईना पण न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. "कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी न्यायालयाचा हा निकाल गुन्हेगारांना जरब बसवणारा ठरेल," असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 10:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Maval Theft: साखर झोपेतच संपूर्ण कुटुंब संपवलं; अख्खा पुणे जिल्हा हादरवणाऱ्या त्या 'मावळ दरोडा' प्रकरणात मोठा निकाल









