'ती आमच्यासमोर बसलीये...,' मुंबईतल्या प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरांना फोन, पुढं जे घडलं धक्कादायक
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून फोनवरून दिलेल्या धमक्यांमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मुंबई: रुग्णसेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील प्रसिद्ध नायर रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातील एका विभागप्रमुख डॉक्टरांना खोट्या विनयभंगाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून फोनवरून दिलेल्या धमक्यांमुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणात पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी संबंधित डॉक्टरांच्या मोबाईलवर एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख पनवेल पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई म्हात्रे अशी करून दिली. नायर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने डॉक्टरांविरोधात विनयभंगाची तक्रार दिली असून ती महिला सध्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी बसली असल्याचा दावा करण्यात आला. तात्काळ पोलिस ठाण्यात हजर राहावे, अन्यथा तुमचे लोकेशन काढून कारवाई करू, अशी धमकीही देण्यात आली.
advertisement
या घटनेनंतर 10 डिसेंबर रोजी डॉक्टरांना पुन्हा एकदा फोन आला. यावेळी कॉल करणाऱ्याने स्वतःला ‘किंगमेकर ग्रुप’चा अध्यक्ष भैय्या गायकवाड असल्याचे सांगत, प्रकरण गंभीर असून पोलिस कारवाई टाळायची असेल तर सहकार्य करावे लागेल, अशा शब्दांत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सतत येणाऱ्या फोन कॉल्स आणि गंभीर आरोपांमुळे डॉक्टर मानसिक तणावात आले.
advertisement
संशय बळावल्याने पोलिसांकडे धाव
हा प्रकार संशयास्पद वाटू लागल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करताच संपूर्ण प्रकरणाचा बनाव उघड झाला. तपासात समोर आले की, 23 नोव्हेंबर रोजी फोन करणारा व्यक्ती साहिल वाघमोडे (वय 21, नवी मुंबई) होता, तर 10 डिसेंबर रोजी वापरण्यात आलेला मोबाईल नंबर तुषार मुगदुम (वय 20) याचा होता.
advertisement
पगाराच्या वादातून कट रचल्याचा संशय
पोलिस तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर आली. तक्रारदार डॉक्टर यांच्या पत्नी पनवेल येथे एक खासगी हॉस्पिटल चालवतात. त्या हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश येवले (वय 26) फार्मासिस्ट म्हणून, तर अजय कदम (वय 22) एक्स-रे टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत पगार न मिळाल्याने दोघेही हॉस्पिटल व्यवस्थापनावर नाराज होते. दरम्यान, येवले याने राजीनामा दिल्यानंतर त्याचा पूर्ण पगार देण्यात आला; मात्र कदम याचा पगार थकीतच राहिला होता.
advertisement
पोलिस असल्याचे भासवून धमकी
पोलिसांच्या मते, येवले, कदम, मुगदुम आणि वाघमोडे हे चौघेही एकाच परिसरात राहत होते. पगाराच्या वादातून डॉक्टरांवर दबाव टाकण्यासाठी आणि पैशांची वसुली करण्याच्या उद्देशाने त्यांनी पोलिस असल्याचा बनाव रचल्याचा संशय आहे. डॉक्टरांना खोट्या विनयभंगाच्या प्रकरणात गोवण्याची भीती दाखवून पैसे उकळण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
advertisement
चौघांविरोधात गुन्हा दाखल
पोलिस असल्याचे भासवून धमकी देणे, फसवणूक करणे आणि बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी कोणी या कटात सामील आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 10:06 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
'ती आमच्यासमोर बसलीये...,' मुंबईतल्या प्रसिद्ध रुग्णालयाच्या डॉक्टरांना फोन, पुढं जे घडलं धक्कादायक










