Pune Crime: 'ती' माहिती गुगलवर सर्च करणं पडलं महागात; पुण्यातील काकांनी क्षणात गमावले दोन लाख रूपये
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
नाशिककर यांना त्यांच्या कुटुंबातील बँक ऑफ बडोदाच्या एका 'डेथ क्लेम' (वारसा हक्क दावा) संदर्भात काही माहिती हवी होती. यासाठी त्यांनी गुगलवर बँकेचा कस्टमर केअर क्रमांक शोधला
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरातून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात 'बनावट कस्टमर केअर'च्या माध्यमातून एका ज्येष्ठ नागरिकाला १ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुगलवर मिळालेल्या टोल फ्री क्रमांकावर विश्वास ठेवणे रत्नाकर देवेंद्र नाशिककर (वय ६४) या ज्येष्ठ नागरिकाला महागात पडले आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार नाशिककर यांना त्यांच्या कुटुंबातील बँक ऑफ बडोदाच्या एका 'डेथ क्लेम' (वारसा हक्क दावा) संदर्भात काही माहिती हवी होती. यासाठी त्यांनी गुगलवर बँकेचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. दुर्दैवाने, त्यांना सायबर भामट्यांचा बनावट क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवले.
advertisement
अशी झाली फसवणूक: संशयित आरोपीने नाशिककर यांचा विश्वास संपादन केला आणि क्लेमची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना व्हॉट्सॲपवर एक 'एपीके' (APK) फाईल पाठवली. ही फाईल डाऊनलोड करून माहिती भरण्यास सांगण्यात आले. नाशिककर यांनी ती फाईल डाऊनलोड करताच, आरोपींना त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळाला. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ९९ हजार ५०० रुपये अज्ञात खात्यावर वळवण्यात आले.
advertisement
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाशिककर यांनी रावेत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांक धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलीस आता या क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. गुगलवर दिसणारे सर्व कस्टमर केअर क्रमांक खरे नसतात. बँकिंग कामांसाठी केवळ अधिकृत वेबसाईटचा वापर करावा आणि अनोळखी व्यक्तीने पाठवलेली कोणतीही फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 9:58 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: 'ती' माहिती गुगलवर सर्च करणं पडलं महागात; पुण्यातील काकांनी क्षणात गमावले दोन लाख रूपये








