नेमकी घटना काय?
तक्रारदार डॉक्टरांचा कात्रज भागात स्वतःचा खासगी दवाखाना आहे. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास दोन तरुण त्यांच्या दवाखान्यात आले. "एक रुग्ण अत्यंत गंभीर असून त्याला तातडीने तपासण्याची गरज आहे," अशी खोटी बतावणी त्यांनी केली. डॉक्टरांनी माणुसकीच्या नात्याने त्यांच्यासोबत जाण्याचे मान्य केले. चोरटे डॉक्टरांना घेऊन पुणे-सातारा रस्त्यावरील 'अथर्व परिहाज' इमारतीच्या तळमजल्यावर गेले.
advertisement
इमारतीच्या निर्जन स्थळी पोहोचताच चोरट्यांनी आपले खरे रूप दाखवले. त्यांनी डॉक्टरांना चाकूचा धाक दाखवून धमकावण्यास सुरुवात केली. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका चोरट्याने डॉक्टरांच्या बोटावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी डॉक्टरांची दुचाकी, मोबाईल, ३० हजार रुपयांची रोकड आणि पिशवीतील सुमारे एक लाख रुपये किमतीचा चांदीचा जग असा एकूण मोठा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि तिथून पळ काढला.
या धक्कादायक प्रकारामुळे डॉक्टर प्रचंड दहशतीखाली होते. त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार आणि सहाय्यक निरीक्षक जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्यांच्या वर्णनावरून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सद्दाम फकीर करत आहेत.
