पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी गुलटेकडीतील महर्षीनगर भागात राहायला आहे. २४ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तक्रारदार महिलेचे पती दुकानात गेले. दुपारी ते घरी जेवण करण्यासाठी यायचे. मात्र, दुपारी जेवण करण्यासाठी पती घरी आले नाहीत. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करुन आरोपींनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.
advertisement
अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन महिलेच्या पतीने संपर्क साधला. ‘माझे अपहरण करण्यात आले आहे. माझ्या जिवाला धोका आहे. मला डांबून ठेवले आहे’, असे व्यापाऱ्याने पत्नीला सांगितले. अपहरण करणाऱ्या आरोपींनी पत्नीकडे दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यानंतर पतीची सुटका करतो, अशी धमकी दिली.
या घटनेनंतर घाबरलेल्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करत आहेत. मात्र, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
