जंगली महाराज रस्ता, घोले रस्ता आणि आपटे रस्त्यांच्या परिसरात नाट्यगृहे, हॉटेल्स, खानावळी, मंगल कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच शासकीय दफ्तरं मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या भागात दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. मात्र, पार्किंगसाठी पुरेशी सोय उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. मुख्य रस्त्यांवर तसेच आंतरिक गल्लीबोळात वाहन उभी करण्याचा पर्याय वापरावा लागतो. यामुळे स्थानिक रहिवाशांकडून आक्षेप नोंदवला जातो, शिवाय वाहतूक पोलिसांकडून कारवाईही होते. या सगळ्यामुळे वाहनचालकांचे हाल होतात.
advertisement
याच समस्येचे निराकरण म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळ महापालिकेने अत्याधुनिक यांत्रिक वाहनतळ उभारला होता. प्रारंभी काही महिने या वाहनतळाचा चांगला उपयोग झाला. परंतू, देखभाल न झाल्याने तो बंद पडला. गेल्या दहा वर्षांपासून ही सुविधा वापराविना पडून आहे.
महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनतळ उभारणाऱ्या कंपनीसह इतर काही कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. दुरुस्ती आणि आवश्यक सुधारणा झाल्यानंतर ही पार्किंग सुविधा नागरिकांसाठी खुली केली जाईल.
यांत्रिक वाहनतळाची वैशिष्ट्ये :
तीन मजल्यांपर्यंत वाहन पार्किंगची सोय
लिफ्टच्या माध्यमातून वाहन ठेवण्याची आधुनिक सोय
सुमारे 80 मोटारी पार्क करण्याची क्षमता
विशेष प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी सांगितले की, ''या वाहनतळाच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. रस्त्यावरची पार्किंगची समस्या काही अंशी सुटेल आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.''