गेल्या वर्षीच्या तुलनेत पालेभाज्यांचे भाव खूपच परवडणारे झाले आहेत. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच बाजारात महिलांची मोठी गर्दी दिसून आली. नैवेद्यासाठी लागणाऱ्या भाज्यांमध्ये मेथी, शेपू, पालक, आंबट चुका, लाल माठ, राजगिरा, अंबाडी, चाकवत आदी पालेभाज्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे, गौराईला परंपरेनुसार 16 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे.
मार्केट यार्डातील स्थिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात रविवारी भाज्यांच्या खरेदी-विक्रीत चैतन्य दिसून आले. येथील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले की, पालेभाज्यांच्या आवक वाढल्यामुळे दर आटोक्यात आले आहेत. काही भाज्यांचे भाव मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहेत, तर काहींमध्ये 10 ते 15 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे.
advertisement
शेपू, अंबाडी आणि चाकवत या भाज्यांच्या किमतींमध्ये किंचित वाढ नोंदवली गेली. तर पालक, मेथी, राजगिरा यांसारख्या भाज्या तुलनेने स्वस्त मिळाल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. याशिवाय भोपळा, पडवळ या भाज्यांनाही नैवेद्यासाठी विशेष मागणी होती. पहिल्याच दिवशी या भाज्यांच्या खरेदीला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गृहिणींना दिलासा
गेल्या काही दिवसांपासून महागाईने कुटुंबाचा खर्च वाढवला होता. मात्र, सणासुदीच्या काळात पालेभाज्यांचे दर कमी झाल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. अनेक गृहिणींनी सांगितले की, नैवेद्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या परवडणाऱ्या दरात मिळाल्याने तयारी अधिक सुलभ झाली आहे. गौराई पूजनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत अजूनही भाज्यांच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.