अलीकडील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था अधिकच जाणवली आहे. महापालिकेच्या पथ विभागाने केलेल्या दुरुस्ती कामातील त्रुटी उघड झाल्या आहेत. मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कोंडी होत आहे, अपघातांचा धोका वाढला आहे तसेच पावसाचे पाणी वाहून न जाता रस्त्यावरच साचल्याने नागरिकांच्या त्रासात वाढ झाली आहे.
फुटपाथ आणि रस्त्यांवर विक्रेते आणि दुकानदारांनी केलेले अतिक्रमण ही देखील गंभीर समस्या ठरली आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येत नाही. अनेक ठिकाणी दुकानदारांनी आपले साहित्य रस्त्यावर मांडल्याने रस्त्यांची रुंदी कमी होत आहे. या संदर्भातील अनेक तक्रारी नागरिकांकडून वारंवार प्रशासनाकडे येत असून त्यावर अपेक्षित कारवाई होत नसल्याची तक्रार आहे.
advertisement
याच पार्श्वभूमीवर आयुक्त राम यांनी पथ, अतिक्रमण, मलनिस्सारण यांसह इतर महत्त्वाच्या विभागातील अभियंता, अधीक्षक अभियंता आणि संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष शहरातील विविध भागांत फिरून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कामात उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त देखील सहभागी होणार आहेत.
राम यांनी स्पष्ट केले की,स्थानिक पातळीवर नागरिक कोणत्या समस्यांना सामोरे जात आहेत. हे केवळ कागदोपत्री तक्रारींवरून समजणे शक्य नाही. अधिकारी प्रत्यक्ष त्या भागात गेले तर परिस्थितीची खरी कल्पना येते. त्यामुळे पुढील काही दिवसांत अधिकारी थेट रस्त्यावर जाऊन नागरिकांच्या तक्रारींची पडताळणी करतील.
महापालिका आयुक्त स्वतः काही भागांना भेट देणार असून अधिकारी काम कशा प्रकारे करतात, याची थेट पाहणी करणार आहेत. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम सकारात्मक ठरणार आहे. प्रशासनाला प्रत्यक्ष स्थळावर समस्या समजल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करता येतील. त्यामुळे खड्डे, गटारांचे प्रश्न किंवा अतिक्रमण या सर्व बाबींच्या सोडवणुकीचा वेग वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.