कधी पर्यंत रस्ते राहतील बंद?
पुणे शहरातील केशवराव जेधे चौक, स्वारगेट येथे असलेला भुयारी मार्ग 19 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजल्यापासून बंद करण्यात आला असून तो 22 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात वाहनचालकांनी दररोज वापरला जाणारा हा मार्ग टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. वाहतूक पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांना याबाबत माहिती देऊन सहकार्याची विनंती केली आहे.
advertisement
नेमका प्रश्न काय आहे?
भुयारी मार्गात पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी लोखंडी चॅनल बसविण्यात आले होते.परंतू, कालांतराने ते तुटल्याने पावसाळ्यात पाणी साचून राहू लागले. त्यामुळेच वाहनांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. याशिवाय तुटलेल्या लोखंडी चॅनलमुळे वाहनं जाताना मोठा आवाज होत होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांपासून ते वाहनधारकांपर्यंत सर्वांनी या समस्यांवर वारंवार तक्रारी केल्या होत्या.
मात्र, पावसाळा, सततचे व्हीआयपी दौरे तसेच गणेशोत्सव काळातील कार्यक्रमांमुळे हे काम वारंवार पुढे ढकलले गेले. अखेर आता कामाला परवानगी देण्यात आली असून येत्या चार दिवसांत लोखंडी चॅनल बदलले जाणार आहेत. त्याचबरोबर ड्रेनेज लाईनची स्वच्छता आणि मजबुतीकरणाची कामेसुद्धा केली जाणार आहेत.
वाहतुकीची पर्यायी व्यवस्था
या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने सारसबागकडे जाणाऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, भुयारी मार्ग सुरू होण्यापूर्वी डावीकडील रस्ता वापरून जेधे चौकातून पुढे जाता येईल आणि तेथून अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे सारसबागकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी या मार्गाचा वापर करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मदत करावी असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
चार दिवसांसाठी स्वारगेट भुयारी मार्ग बंद राहणार असून या काळात होणाऱ्या कामांमुळे पुढील काही वर्षे हा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची अपेक्षा आहे. पुणेकरांनी काहीशी गैरसोय सहन करून पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर केल्यास वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि काम लवकर पूर्ण होण्यास मदत होईल.