21 ऑक्टोबरला फक्त 12 तास धावणार मेट्रो
सध्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड (पर्पल लाईन) आणि वनाज ते रामवाडी (एक्वा लाईन) या दोन्ही मार्गांवर पहाटे 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो सेवा अखंडित सुरू असते. मेट्रोकडे एकूण 34 गाड्या असून, प्रत्येक 6 ते 7 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावत असते. दिवसातून मिळून सरासरी 554 फेऱ्या घेतल्या जातात, त्यापैकी पर्पल लाईनवर 300 तर एक्वा लाईनवर 254 फेऱ्या होतात. मात्र, 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनानिमित्त फक्त 12 तास सेवा सुरू राहणार असल्याने दिवसभरातील सुमारे 350 ते 400 फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दिवशी मेट्रो सेवा सुमारे 30 ते 40 टक्क्यांनी घटणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी दोन लाखांच्या आसपास असते. मात्र, दिवाळीच्या काळात या प्रवासी संख्येत लक्षणीय घट होत असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षीच्या दिवाळीत तब्बल 1 ते सव्वा लाखांनी प्रवासी संख्येत घट झाली होती. याच पार्श्वभूमीवर यंदाही लक्ष्मीपूजनानिमित्त 21 ऑक्टोबर रोजी (मंगळवार) मेट्रो सेवा सायंकाळी 6 नंतर बंद ठेवण्याचा निर्णय महामेट्रोकडून घेण्यात आला आहे.
फटाक्यांची ने-आण करण्यासही मज्जाव
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाके आणि ज्वलनशील वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, मेट्रोमध्ये अशा वस्तूंची ने-आण करण्यास मज्जाव असल्याचे महामेट्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांनी या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांच्या सामानाची वेळोवेळी तपासणी करण्यात येणार असून, ज्वलनशील पदार्थ आढळल्यास संबंधित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही महामेट्रोकडून देण्यात आला आहे.
दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या सुटीमुळे सायंकाळनंतर मेट्रो प्रवासासाठी गर्दी कमी असते. त्यामुळे मंगळवारी दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सेवा सायंकाळी सहा वाजेनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी मात्र नियमित वेळापत्रकानुसार मेट्रो सेवा पुन्हा सुरू राहणार असून, मेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत धावेल, अशी माहिती महामेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक चंद्रशेखर तांबवेकर यांनी दिली आहे.