सध्या मुंबई-पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज 20 ऑगस्ट रोजी देखील हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यातच गेल्या 3 दिवसांत झालेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून दृश्यमानता देखील कमी झाली आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. दिवसभरात धावणाऱ्या 7 गाड्या रद्द केल्या असून त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
advertisement
मुसळधार पावसामुळे अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वे देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईहून पुणे, जालना आणि धुळ्याला जाणाऱ्या गाड्यांचा यात समावेश आहे. पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस, जालना-मुंबई जनशताब्दी या गाड्यांचा समावेश आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकल बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची उपनगरीय सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.