द्रुतगती मार्गावरील धोकादायक भागाला मिळणार पर्याय
मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल नाक्याजवळ एकत्र येतात आणि पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट हा रस्ता सहापदरी असून, या ठिकाणी दहा पदरी वाहतूक एकत्र येते.हा परिसर घाट क्षेत्रातील असल्याने येथे चढ–उतार मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार घडतात.या पार्श्वभूमीवर खोपोली एक्झिट ते कुसगावदरम्यान 13.3 किलोमीटर लांबीच्या ‘मिसिंग लिंक’ रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने 2019 साली हाती घेतले होते.आता ते काम अंतिम टप्प्यात आले आहे.
advertisement
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोर घाटातील सुमारे सहा किलोमीटरच्या वळणाच्या मार्गाला पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे याठिकाणी देशातील सुमारे 181 मीटर उंचीचा दरीपूल उभारला जात आहे. पुलाचा एक भाग तयार झाला असून, उर्वरित मार्ग जोडण्याचे तसेच केबल बसवण्याचे काम सुमारे 93 टक्के पूर्ण झाले आहे.
यंत्रणेद्वारे मिळणार मदत
सुरक्षेसाठी बोगद्यात अलार्म यंत्रणा बसवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी त्या यंत्रणेवरील बटण दाबल्यास नियंत्रण कक्षाला मदतीची गरज असल्याचा इशारा सेन्सॉरच्या माध्यमातून मिळेल. तसेच, या यंत्रणेच्या मदतीने नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधता येईल.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरळीत व सुरक्षित होईल.
