पुण्याचा कारभारी कोण याकडे सगळ्यांचेच लक्ष असून अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यासोबतच गणेश बिडकर, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, प्रशांत जगताप, अमोल बालवडकर, रूपाली पाटील यांच्या निकालाकडे ही सगळ्यांचेच लक्ष आहे. संपूर्ण मतमोजणी दरम्यान पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. पुणे महानगरपालिकेत १६५ जागा असून यापैकी २ जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत तर काल १६३ जागांसाठी मतदान झाले आहे.
advertisement
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता पुण्यात कुणाचा महापौर होणार? असा सवाल देखील विचारला जातोय.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल ९ वर्षांनंतर शहरवासीयांना आपला कौल देण्याची संधी मिळाली आहे. शहरातील ४१ प्रभागांमधून एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. या निवडणुकीत चौरंगी सामना रंगला होता. महायुतीतील तीन पक्ष वेगळे लढत असल्याने स्पर्धा तीव्र झाली होती. अशातच आता कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार? असा सवाल विचारला जात आहे.
