मेट्रो स्थानकांवर पार्किंग नियोजन
शहरात महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गावर मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. काही स्थानकांवर थोड्या प्रमाणात पार्किंगची सोय आहे, परंतु प्रत्यक्षात मेट्रोचा वापर करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे ती पुरेशी नाही. तसेच, मेट्रो स्थानकांपर्यंत फीडर सेवा काही ठराविक मार्गांपुरतीच उपलब्ध असल्यामुळे अनेक प्रवाशांना स्वतःची वाहने घेऊन मेट्रोपर्यंत यावे लागते. या कारणास्तव महामेट्रोकडून महापालिकेकडे अतिरिक्त पार्किंग जागांची मागणी केली होती.
advertisement
महापालिका आता पार्किंगसाठी अॅमेनिटी स्पेस म्हणून ताब्यातील काही जागांचा उपयोग करणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर पार्किंगची सुविधा मिळेल.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावर पुणे शहरातील आठ ठिकाणी आणि पीएमआरडीएच्या हद्दीतील दोन जागी वाहनतळ तयार केले जाणार आहेत.
पुणे महापालिकेकडून हद्दीतील 13,051 चौरस मीटर जागा या वाहनतळांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये काही ठळक ठिकाणे अशी आहेत:
बालेवाडी (सर्व्हे क्रमांक 28/19) – बालेवाडी स्टेडियम जवळ, फूड स्टेशनपासून 300 मीटर अंतरावर
बालेवाडी (सर्व्हे क्रमांक 28/38/1) – एनआयसीएमएआर, अमर टेकपार्क स्टेशनपासून 250 मीटर अंतरावर
बालेवाडी (सर्व्हे क्रमांक 3, रामनगर) – के स्क्वेअर लिव्हिंग समोर, स्टेशनपासून 400 मीटर अंतरावर
मेट्रो स्थानकांच्या परिसरात पालिकेकडून महामेट्रोसाठी 20 पार्किंग जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून या जागांची अंतिम रूपरेषा तयार करण्याचे काम सुरू आहे. आगामी आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक होणार असून, त्यानंतर आयुक्तांच्या मान्यतेनंतरच ही जागा महामेट्रोला हस्तांतरित केली जाणार आहे, असे प्रकल्प व्यवस्थापन विभाग प्रमुख दिनकर गोजारे यांनी सांगितले.