नेमकी घटना काय?
निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे सध्या ठिकठिकाणी नाकाबंदी आणि संशयित वाहनांची तपासणी सुरू आहे. पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात सांगवी पोलिसांचे पथक तैनात असताना त्यांना एक दुचाकीस्वार संशयास्पदरीत्या जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या खांद्यावरील बॅगेची झडती घेतली असता, पोलिसांना धक्काच बसला. त्या बॅगेत १२ लाख रुपयांची भारतीय चलनातील रोकड आणि २ लाख रुपयांचे परदेशी चलन असे एकूण अंदाजे १५ लाख रुपये आढळून आले.
advertisement
सांगवी पोलिसांनी तातडीने दुचाकीस्वारासह ही रोकड ताब्यात घेतली. प्राथमिक चौकशीत संबंधित तरुणाने आपला 'फॉरेन करन्सी एक्स्चेंज'चा (परकीय चलन विनिमय) व्यवसाय असल्याचे सांगितले आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगण्याबाबत अधिकृत कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची गांभीर्याने दखल घेत परकीय चलन विभाग (FEMA) आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. ही रक्कम नेमकी कोठून आली आणि ती कोठे नेली जात होती, याचा सखोल तपास सुरू आहे. जर कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
