फसवणुकीची धक्कादायक पद्धत: मिळालेल्या माहितीनुसार, माणिकबाग परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी जुलै महिन्यात संपर्क साधला होता. "पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तुमच्या बँक खात्याचा वापर झाला असून, जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत," अशी भीती चोरट्यांनी त्यांना घातली. आपण निर्दोष आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न केल्यावर "तुम्हाला अटक होऊ शकते, ही कारवाई टाळायची असेल तर तपासासाठी पैसे जमा करावे लागतील," असे चोरट्यांनी धमकावले.
advertisement
पोलिसी कारवाई आणि अटकेच्या भीतीने ज्येष्ठ नागरिक पूर्णपणे घाबरले. चोरट्यांनी याचाच फायदा घेत त्यांना तांत्रिक प्रक्रियेच्या नावाखाली बँक खात्यात पैसे जमा करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी वेळोवेळी चोरट्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांत एकूण १७ लाख ४३ हजार ४९० रुपये जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
शहरात सध्या 'डिजिटल अरेस्ट' आणि 'सीबीआय-पोलीस' असल्याचे सांगून लूट करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कोणताही सरकारी विभाग किंवा पोलीस फोनवर अशा प्रकारे पैशांची मागणी करत नाहीत. अशा फोन कॉल्सला बळी न पडता नागरिकांनी तात्काळ १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
