पुण्यातील अनोखा मेळावा: पुण्यात आयोजित या कार्यक्रमात ६० ते ८० वर्षे वयोगटातील अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. जोडीदाराच्या शोधात असलेल्या या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि नवी उमेद पाहण्यासारखी होती. हे केवळ विवाहासाठीचे आयोजन नव्हते, तर एकाकीपणा दूर करून सुखाचा सोबती शोधण्याचा एक भावनिक प्रयत्न होता.
या उपक्रमाचा व्हिडिओ शेअर करताना शेनाझने लिहिले की, "जेव्हा मी या ज्येष्ठांना नव्या जोडीदाराला भेटताना एखाद्या लहान मुलासारखं लाजताना आणि हसताना पाहिलं, तेव्हा मी भावूक झाले." यातील अनेक जण असे होते ज्यांनी आपला जोडीदार गमावला होता किंवा ज्यांचा घटस्फोट झाला होता. तरीही, पुन्हा एकदा सुखी होण्याची आशा घेऊन ते या मेळाव्यात आले होते.
advertisement
या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे धर्म, जात, पैसा किंवा सामाजिक प्रतिष्ठा याला थारा नव्हता. लोक कोणत्याही संकोचाशिवाय एकमेकांशी गप्पा मारत होते, विनोद करत होते आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. येथे फक्त माणुसकी, आपुलकी आणि प्रेम महत्त्वाचे होते.
एकाकीपणावर मात करण्यासाठी पुढाकार: अनेक सहभागींनी सांगितले की, आयुष्यभर कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार कधीच केला नाही. विशेषतः कोरोना महामारीनंतर अनेकांचा एकटेपणा वाढला होता. अशा परिस्थितीत हा मेळावा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा नव्याने जगण्याची आणि खास वाटण्याची संधी ठरला.
सोशल मीडियावर या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. अनेकांनी म्हटले आहे की, हा कार्यक्रम समाजाच्या त्या जुन्या विचारसरणीला चपराक देणारा आहे, जिथे मानले जाते की प्रेम करण्यासाठी ठराविक वय लागते.
