वाघोलीत ३६ लाखांची लूट: वाघोली परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी ऑनलाइन गेमच्या जाळ्यात ओढले. सुरुवातीला एका लिंकद्वारे गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर त्याला ऑनलाइन गेम खेळण्यास प्रवृत्त करून चोरट्यांनी गेल्या आठ महिन्यांत वेळोवेळी ३६ लाख ७४ हजार रुपये स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
advertisement
हडपसरमध्ये 'ऑनलाइन टास्क'चा सापळा: दुसऱ्या एका घटनेत हडपसरमधील एका तरुणाला घरातून काम करून पैसे कमविण्याचे आमिष दाखवण्यात आले. चोरट्यांनी सुरुवातीला काही सोपे 'ऑनलाइन टास्क' दिले आणि विश्वासासाठी त्याच्या खात्यात काही रक्कम परतावा म्हणून जमा केली. एकदा विश्वास बसल्यानंतर चोरट्यांनी त्याला मोठी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले. अशा प्रकारे या तरुणाची ६ लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे पुढील तपास करत आहेत.
पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा ऑनलाइन गेमिंग आणि टास्कच्या नावाखाली पैसे गुंतवू नका. फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा
