'स्मार्ट सिटी' प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेला हा पूल वाकड आणि बालेवाडी या दोन वेगाने विकसित होणाऱ्या भागांना थेट जोडेल. याचा सर्वाधिक फायदा हिंजवडी आयटी पार्क, बालेवाडी हायस्ट्रीट, विविध शिक्षण संस्था आणि व्यावसायिक क्षेत्रांत जाणाऱ्या नागरिकांना होईल. पिंपळे निलख, रावेत, वाकड आणि चिंचवड भागातून बालेवाडीकडे येणाऱ्या वाहनचालकांना आता लांबचा वळसा घालण्याची गरज उरणार नाही.
advertisement
कामाची सद्यस्थिती : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुलाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, पुणे महापालिका हद्दीत (बालेवाडी बाजूने) एका जमिनीच्या तुकड्यावरून कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. ३० फूट जागेच्या मोबदल्यावरून संबंधित जमीनमालक शेतकरी आणि पुणे महापालिका यांच्यात न्यायालयात दावा सुरू आहे. या वादामुळे पुलाच्या तोंडाशी राडारोडा टाकण्यात आला असून, काम पूर्ण होऊनही पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत.
वाहतूक कोंडीतून दिलासा: सध्या बालेवाडी आणि वाकड दरम्यान प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेले रस्ते अपुरे असून तिथे मोठी कोंडी होते. हा पूल सुरू झाल्यास मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होईल. प्रशासनाने जमिनीचा हा वाद तातडीने मिटवल्यास पुढील काही दिवसांत हा मार्ग नागरिकांसाठी खुला होऊ शकतो. पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही शहरांसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
