शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून आणि लगतच्या औद्योगिक नगरीतून समोर येणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांनी सगळ्यांनाच हादरवून टाकलं आहे. क्षुल्लक वादातून थेट कोयते काढण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली असून, शहरात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये वाढणारी ही हिंसक प्रवृत्ती चिंतेचा विषय ठरत आहे.
advertisement
याप्रकरणी गजानन जगदेव इंगळे (वय २४, रा. चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश महादेव पुजारी (वय १८) आणि उत्कर्ष हनुमंत गुंडे (वय १८) या दोन तरुणांनी गजानन यांना त्यांच्या रिक्षातून आनंदनगर येथे सोडण्याची मागणी केली होती. मात्र, गजानन यांनी त्यांना रिक्षात बसवण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी गजानन यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. मारहाण केल्यानंतर आरोपींनी गजानन यांच्याकडील रोख रक्कमही जबरदस्तीने हिसकावून नेली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
