भाजप उमेदवारांचे घायवळसोबतचे फोटो
आम्ही चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला पण समोरच्यांनी काय उमेदवार दिले. प्रभाग क्रमांक 16 मध्ये ज्या महिला उमेदवार दिलेल्या आहेत, त्याचे पती मटका व्यवसाय करतात. अशा लोकांना उमेदवारी दिली तर काय आपलं होणार याचा विचार करा. पुण्यात तर निलेश घायवळ याच्यासोबत त्यांच्या उमेदवारांचे फोटो आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी भाजप उमेदवारांचे निलेश घायवळसोबतचे फोटो दाखवले. हा पठ्ठ्या याला कुणी मदत केली, सर्वांना माहितीये, असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा मुरलीधर मोहोळ यांना डिवचलं. स्वत: टोपी घातली अन् दुसऱ्याला देखील टोप्या घालतायेत, असं म्हणत अजित पवार यांनी चिमटे काढले.
advertisement
तुम्ही फक्त यांना निवडून द्या...
अजित पवार यांनी केशवनगर, मुंढवा, मांजरी, हडपसर या प्रभागात काल रॅली काढली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. रॅलीनंतर दादांनी हडपसरमध्ये भव्य सभा घेतली. यावेळी तुफान गर्दी पहायला मिळाली. अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं की, तुम्ही फक्त यांना निवडून द्या, मी यांच्या महोरक्या होतो. मी सुत्र हातात घेतो. पुण्याची व्यवस्था सुधारण्याचं काम माझ्याकडं आलं म्हणून समजा, असं अजित पवार म्हणाले.
अखेरच्या दिवशी जोरदार प्रचार
दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी पाणी व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, ट्रॅफिक याविषयी आश्वासन दिलं. आता अखेरच्या दिवशी देखील अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस देखील पुण्यात आहेत. त्यामुळे आता आजचा दिवस गाजणार यात शंका नाही.
