काय आहे नेमका निर्णय?
महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये नुकताच दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा दिलासादायक निर्णय घेतला आहे. सध्या पालिकेत कामावर असताना मृत्यू झाल्यास 75 हजार रुपयांची मदत मिळते, तर अपघात किंवा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा पॉलिसीद्वारे 25 लाखांची मदत मिळते. मात्र, नैसर्गिक मृत्यू झाल्यास मदतीची कोणतीही तरतूद नव्हती. ही उणीव भरून काढण्यासाठी आयुक्तांनी 5 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश कामगार कल्याण विभागाला दिले आहेत. याचा लाभ विशेषतः तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
advertisement
वैद्यकीय सुविधांचे बळकटीकरण:
महापालिका इमारतीत दररोज हजारो नागरिक आणि कर्मचारी असतात. आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळावी यासाठी इमारतीत कायमस्वरूपी कार्डिअक कक्ष उभारला जाणार आहे. या कक्षात प्रथमोपचारासाठी एक स्वतंत्र डॉक्टर नियुक्त केला जाईल. जेणेकरून भविष्यात हृदयविकाराचा झटका किंवा तत्सम घटना घडल्यास वेळेत उपचार मिळून जीवितहानी टाळता येईल. सध्या पालिकेत रुग्णवाहिका तैनात असते, मात्र त्यात डॉक्टर नसतात. आता ही उणीव दूर केली जाणार आहे.
