नेमकी घटना काय?
रणजीत प्रकाश भोसले (वय 51, रा. वडगाव शेरी) असे घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री रणजीत भोसले हे नगर रस्त्यावरील पीएमपी बस थांब्यावर बसची प्रतीक्षा करत उभे होते. बस आल्यानंतर ते दारात चढत असतानाच पाठीमागून आलेल्या एका भरधाव ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, भोसले गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
ट्रक चालकावर गुन्हा दाखल
याप्रकरणी प्रवेश यादव (वय ३२, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पीएमपीच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
पुण्यातील औंध परिसरातही एका भरधाव पीएमपी बसने रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ७५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, निष्काळजीपणे बस चालवल्याप्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला ज्ञानोबा वाव्हाळ (वय ७५, रा. इंदिरा गांधी वसाहत, औंध) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ३० जानेवारी रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास चंद्रकला या गणेशखिंड रस्त्यावरून जात होत्या. औंध येथील केंद्रीय विद्यालयासमोरून रस्ता ओलांडत असताना, पाठीमागून आलेल्या एका भरधाव पीएमपी बसने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गंभीर दुखापत झाल्यामुळे चंद्रकला वाव्हाळ यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रभावती भोसले (वय ७४, रा. औंध) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
