उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी 580 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि साडेचार लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. आरोपीने गुन्हा करताना कोणतीही ओळख पटू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली होती. त्याने चेहरा झाकून घेतला होता तसेच चोरीनंतर तो रिक्षामधून फरार झाला. रिक्षाची नंबरप्लेट देखील त्याने झाकून ठेवली होती.
advertisement
मुंबई-पुणे महामार्गावर पोलिसांनी अडवली कार; आत 2 महिला अन् सोबत पुरुष, दरवाजा उघडताच बसला धक्का
या गुन्ह्याचा तपास करत असताना वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग काढला. पोलिसांनी चोरीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा शोधून काढली. रिक्षामालकाकडे चौकशी केली असता, अरविंद प्रल्हादसिंग राजपुरोहित (वय 29, रा. पळस वाघजाईनगर, म्हाळुंगे) हा रिक्षा घेऊन गेल्याची माहिती मिळाली. पुढील तपासात अरविंद हा घरफोडी झालेल्या व्यक्तीचा पुतण्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, वारजे माळवाडी पोलिसांनी आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. देवऋषी परिसरातील एका घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीस गेली होती. या प्रकरणात अजय भागवत फपाळ (वय 19), कैलास दत्ता फकपाळ (वय 25, दोघे रा. म्हाळुंगे, उत्तमनगर, मूळ माजलगाव, बीड) आणि बालाजी मधुकर ढगे (वय 24, रा. न्यू अहिरेगाव, मूळ वडवणी, बीड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी ढगेकडून 180 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 10 लाख रुपयांची रोकड, तर आरोपी कैलासकडून 194 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 19 लाख 24 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे, प्रकाश धेंडे, नीलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे तसेच निखिल तांगडे, अमित शेलार, योगेश वाघ, सागर कुंभार, शरद पोळ, बालाजी काटे यांच्या पथकाने केली आहे.






