निलेश घायवळ हा काही दिवसांपूर्वी देश सोडून पळाला आहे. सध्या तो स्वित्झर्लंड देशात असल्याची माहिती आहे. घायवळला पुन्हा भारतात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. निलेश घायवळ देश सोडून पळाला असला तरी त्याने आपल्यामागे कोट्यवधींची संपत्ती सोडली आहे. मागील दोन दिवसांच्या छापेमारीत पोलिसांना मोठं घबाड आढळलं आहे.
दोन दिवसात पुणे पोलिसांच्या हाती घायवळ याच्या घरातून अनेक कागदपत्रं सापडली आहेत. यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, 10 डेबिट कार्ड, 5 क्रेडिट कार्ड यासह अनेक जमिनीच्या कागदपत्रांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रं पुणे पोलिसांनी घायवळच्या घरातून जप्त केली आहेत. यासोबतच घायवळ याच्या घरात पोलिसांना 10 तोळे सोने, काही चांदी आणि मोठ्या प्रमाणात रक्कम देखील सापडली आहे.
advertisement
निलेश घायवळ याच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलीस घायवळच्या सगळ्या ठिकाणांवर छापेमारी करत आहे. इतरही अनेक ठिकाणांवर पोलीस छापेमारी करणार असल्याची माहिती आहे. गरज पडली तर घायवळ याचे अनधिकृत बांधकाम देखील पुणे पोलीस पाडणार असल्याची माहिती आहे. याआधी पोलिसांनी पुण्यात आंदेकर टोळीवर मोठी कारवाई केली आहे. या टोळीशी संबंधित गुन्हेगारांच्या बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवला होता. आता अशीच कारवाई घायवळवर देखील केली जाण्याची शक्यता आहे.