या प्रकरणी रमेश मसनाजी पिट्टलवाड (वय 25, रा. उरुळी देवाची) आणि त्याची सावत्र आई मुक्ताबाई मसनाजी पिट्टलवाड (वय 35, रा. हिंजवडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे ते उत्तर प्रदेश व्हाया हैदराबाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात ओळख झाल्यानंतर रमेशने 13 वर्षीय मुलीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून 18 ऑक्टोबर रोजी पळवून नेलं. या कृत्यात त्याची सावत्र आई मुक्ताबाई हिने रमेशला प्रवास खर्चासाठी पैसे देऊन मदत केली आणि 'हैदराबाद येथील नातेवाइकांकडे जा,' असा सल्ला दिला. त्यानुसार, रमेश आणि अल्पवयीन मुलगी रेल्वेने थेट हैदराबादला गेले.
advertisement
मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच, फुरसुंगी पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रमेश हैदराबादमध्ये असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी मुक्ताबाईला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान तिने दोघं हैदराबादला गेल्याची कबुली दिली. मात्र, पोलिसांना याची माहिती मिळताच रमेश मुलीसह तिथून लगेच पसार झाला.
पोलीस पथकाने तांत्रिक माहिती आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास केंद्रित केला. त्यानुसार, रमेश उत्तर प्रदेशातील बागड जिल्ह्यातील बड़ोत तालुक्यातील बामणौली गावात लपून बसल्याचं समोर आलं.
वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे आणि गुन्हे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव यांच्या विशेष पथकाने तातडीने उत्तर प्रदेशात धाव घेतली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तब्बल चार दिवस कसून शोधमोहीम राबवून रमेशला त्याच्या मावशीच्या घरातून अटक करण्यात आली.
रमेशला ताब्यात घेऊन पुण्यात आणण्यात आलं असून, अल्पवयीन मुलीला सुखरूप वाचविण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण यशस्वी ऑपरेशन पार पडलं.
