मिळालेली माहिती अशी की, संबंधित कुटुंब (कार क्र. MH 14 MT 4609) तुळजापूर आणि येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन पुण्याकडे परतत होते. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कुरकुंभ येथील पुलाच्या पुढे काही कारणांमुळे त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी कारला घेरले.
advertisement
दरोडेखोरांनी केवळ बंदुकीचा धाकच दाखवला नाही, तर प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाणही केली. या दहशतीखाली त्यांनी कारमधील महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून घेतले आणि अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (LCB) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी गाडी उभी करणे धोक्याचे ठरू शकते. पोलिसांनी यापूर्वीही आवाहन केले आहे की, प्रवाशांनी विश्रांतीसाठी हॉटेल, पेट्रोल पंप किंवा वर्दळीच्या नाक्यांचाच वापर करावा. याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.
