नशेत आरडाओरडा करणाऱ्या मित्राला शांत राहण्यास सांगितलं, त्याने रागात दगडानं डोकंच ठेचलं, पिंपरीत खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पृथ्वी गायकवाड हा मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा करून शांतता भंग करत होता. रोहितने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि "शांत बस" असे सांगितले.
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात एका तरुणाला मित्रानेच जबर मारहाण केली. यात केवळ आपल्या मित्राला शांत राहण्याचा सल्ला देणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या मित्राला हटकल्याने चिडलेल्या दोन भावंडांनी एका २४ वर्षीय तरुणावर हल्ला केला. त्यांनी लोखंडी पंच आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना यमुनानगर येथील बालाजी ग्राऊंडजवळ घडली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित सुनील चव्हाण (वय २४) हा तरुण मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत परिसरात उभा होता. त्यावेळी त्याचा मित्र पृथ्वी गायकवाड हा मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा करून शांतता भंग करत होता. रोहितने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि "शांत बस" असे सांगितले. ही साधी सूचना पृथ्वीच्या जिव्हारी लागली. रागाच्या भरात त्याने रोहितची गचांडी धरून त्याच्या डोक्यात लोखंडी पंचने वार केले आणि शिवीगाळ करत त्याला ओढत मैदानाबाहेर नेले. त्याच वेळी पृथ्वीचा भाऊ यश गायकवाड तिथे आला आणि त्याने जमिनीवरील दगड उचलून रोहितच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले.
advertisement
भरवस्तीत घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. जखमी रोहितने दिलेल्या तक्रारीवरून निगडी पोलिसांनी पृथ्वी गायकवाड आणि यश गायकवाड (दोघेही रा. ओटास्कीम, निगडी) यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. दारूच्या नशेत मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याने परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 8:42 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
नशेत आरडाओरडा करणाऱ्या मित्राला शांत राहण्यास सांगितलं, त्याने रागात दगडानं डोकंच ठेचलं, पिंपरीत खळबळ










