हस्तांदोलनाच्या बहाण्याने हात हातात घेतला अन्...; लोणावळ्यात शिवसैनिकासोबत घडला धक्कादायक प्रकार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पिशवी हातात देत असताना एका तरुणाने जवळीक साधून खोले यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा बहाणा केला आणि अत्यंत शिताफीने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी ओढून घेतली. काही कळण्याच्या आतच हे चोरटे आपल्या दुचाकीवरून वेगाने पसार झाले.
पुणे : लोणावळा शहरात भरदिवसा एका ज्येष्ठ शिवसैनिकाला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन भामट्यांनी मदतीचा बनाव रचून त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी लंपास केली आहे. शिवसेनेचे मावळ जिल्हा सल्लागार मारुती खोले (वय ६५) हे २४ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून नांगरगाव येथून गवळीवाडा नाक्याच्या दिशेने जात होते. घरापासून काही अंतरावर असलेल्या ऑलवेल बंगल्यासमोर ते पोहोचले असता, समोरून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्यांना हात दाखवून थांबवले.
या तरुणांनी स्वतःकडे असलेली एक प्लास्टिकची पिशवी खोले यांच्याकडे सुपूर्द केली. ज्यामध्ये बिस्किटाचे पुडे आणि एक हजार रुपये रोख होते. ही पिशवी जवळच्या एखाद्या अनाथाश्रमात किंवा मंदिरात दान करा, अशी विनंती या भामट्यांनी केली. मारुती खोले यांनी समोरच मंदिर असल्याचे सांगून तरुणांना स्वतः जाऊन दान देण्यास सुचवले. मात्र आम्हाला खूप घाई आहे असे सांगून भामट्यांनी पुन्हा एकदा मदतीची विनंती केली. त्याच वेळी पिशवी हातात देत असताना एका तरुणाने जवळीक साधून खोले यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा बहाणा केला आणि अत्यंत शिताफीने त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी ओढून घेतली. काही कळण्याच्या आतच हे चोरटे आपल्या दुचाकीवरून वेगाने पसार झाले.
advertisement
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मारुती खोले यांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयित चोरट्यांचा शोध घेत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 6:48 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
हस्तांदोलनाच्या बहाण्याने हात हातात घेतला अन्...; लोणावळ्यात शिवसैनिकासोबत घडला धक्कादायक प्रकार











