नेमकी घटना काय?
अश्विनी सचिन जोशी (वय ४६, रा. हिंगणे खुर्द) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. अश्विनी यांनी २०११ ते २०२४ या प्रदीर्घ काळात 'लाइफलाइन टूर्स अँड ट्रॅव्हल्स' या कंपनीत नोकरी केली होती. या कालावधीत त्यांनी काही वेळा नोकरी सोडली आणि पुन्हा रुजू झाल्या होत्या. मात्र, जेव्हा त्यांनी कायमची नोकरी सोडून कर्वेनगरमधील दुसऱ्या एका कंपनीत काम सुरू केले, तेव्हापासून त्यांचा छळ सुरू झाला.
advertisement
अश्विनी यांनी नवीन नोकरीसाठी जुन्या कंपनीचे संचालक जीवन जगन्नाथ हेंद्रे (वय ५८) यांच्याकडे अनुभव प्रमाणपत्राची मागणी केली होती. मात्र, हेंद्रे यांनी त्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. एवढेच नाही तर, अश्विनी ज्या नवीन कंपनीत रुजू झाल्या होत्या, तेथील मालकाची भेट घेऊन हेंद्रे यांनी "अश्विनी यांना कामावर ठेवू नका" असे सांगून त्यांची बदनामी केली. या प्रकारामुळे अश्विनी यांना नवीन नोकरीही सोडावी लागली.
वर्षभरानंतर गुन्हा दाखल: जुन्या मालकाकडून होणारा सततचा त्रास आणि नोकरी गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून अश्विनी यांनी ८ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचे पती सचिन जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड सिटी पोलिसांनी आता जीवन हेंद्रे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कर्मचारी सोडून गेल्यानंतर त्यांच्या करिअरमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध या निमित्ताने कडक पाऊल उचलले गेले आहे.
