नेमकी घटना काय?
अहिल्यानगर (नगर रोड) परिसरातील 'सिटी स्पेस बिल्डिंग'मध्ये 'द रुट्स स्पा' (The Roots Spa) नावाचे सेंटर चालविले जात होते. या स्पाच्या नावाखाली अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि. २३) दुपारी साडेतीनच्या सुमारास एक बनावट ग्राहक (डिकॉय कस्टमर) तिथे पाठवला.
advertisement
इमारतीवरून उडी अन् पळण्याचा प्रयत्न
वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली. पोलिसांना दारात पाहताच तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने आणि पुरुषाने कारवाई टाळण्यासाठी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून थेट खाली उडी मारली. उडी मारल्यानंतर पळून जाण्याचा त्यांचा बेत होता, मात्र उंचीवरून पडल्यामुळे दोघेही जबर जखमी झाले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या कारवाईत पोलिसांनी स्पा सेंटरमधील इतर काही जणांनाही ताब्यात घेतले असून, तिथे पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बेकायदा धंद्यांविरुद्ध पोलिसांनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
