नेमकी घटना काय?
वाघोलीतील रेवण अंगडी आणि त्यांचे कुटुंबीय सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर गेले होते. घाईघाईत त्यांनी घराची चावी बाहेर असलेल्या चप्पल स्टँडमध्ये लपवून ठेवली. मात्र, पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी कुटुंबाच्या अनुपस्थितीत ती चावी शोधून काढली आणि मुख्य दरवाजा उघडून घरात प्रवेश केला.
लॉकर फोडून दागिने लंपास
सायंकाळी जेव्हा कुटुंबीय घरी परतले, तेव्हा त्यांना बेडरूममध्ये सोन्याची एक वस्तू जमिनीवर पडलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी कपाट तपासले असता, चोरट्यांनी कपाटाचे लॉकर तोडून आतील सोन्याचे दागिने पळवल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, घराचा दरवाजा उचकटलेला किंवा तोडलेला नसल्याने आणि सुरक्षित असल्याने सुरुवातीला चोरी झाल्याचा संशयही आला नाही.
advertisement
तुमची ही सवय महागात पडू शकते!
पुण्यासारख्या शहरात अनेक नोकरदार कुटुंबे घरातील सदस्यांसाठी किंवा कामाला येणाऱ्या व्यक्तींसाठी चावी ठराविक ठिकाणी (उदा. कुंडीत, चप्पल रॅकमध्ये, खिडकीच्या कडेला) लपवून ठेवतात. चोरटे आता याच सवयीचा फायदा घेत आहेत. वाघोलीत यापूर्वीही अशाच प्रकारे चावी शोधून चोऱ्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
