अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोनू राजकुमार (२५), हवासिंग फत्तेसिंग (६६), अमितकुमार बलवंत सिंग (३१), अजय सतीश कुमार (२८) आणि कुलदीप रामफल (२८) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी हरियाणातील जिंद आणि भिवानी जिल्ह्यांतील रहिवासी आहेत. धक्कादायक म्हणजे, रेल्वेत चोरी केल्यानंतर हे आरोपी विमानाने प्रवास करून पुन्हा आपल्या राज्यात पळून जात असत.
advertisement
काही दिवसांपूर्वी गांधीधाम-बंगळुरू एक्सप्रेसमधून मिरजमधील एक कुटुंब प्रवास करत होतं. गाडी मिरज रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर, 'मदत करतो' असं भासवून या टोळीने त्या कुटुंबातील महिलांचं जड सामान डब्यातून फलाटावर उतरवून देण्याचं नाटक केलं. प्रवाशांची नजर चुकताच त्यांनी २४ लाख रुपये किमतीची हिरेजडीत दागिन्यांची बॅग लंपास केली. या प्रकरणी मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी या चोरीचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते. तांत्रिक तपासावरून आरोपी हरियाणातील असून ते चोरीनंतर दिल्लीला विमानाने निघून गेल्याचे निष्पन्न झाले. पुणे लोहमार्ग पोलिसांचे एक पथक तातडीने दिल्लीला रवाना झाले. तिथे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा लावून या पाचही जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.
रेल्वे प्रवासात अनोळखी व्यक्ती मदतीला आली तर सावध राहणे गरजेचे आहे. ही टोळी विशेषतः सण-उत्सव आणि गर्दीच्या वेळी अशा प्रकारे प्रवाशांना टार्गेट करत असे. या आरोपींकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
