मदतीच्या बहाण्याने पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उकळले पैसे; मग डांबून ठेवत महिलेकडे धक्कादायक मागणी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
त्यांनी चाकण भागातील दोन महिला सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. या कार्यकर्त्यांनी महिलेला न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ७० हजार रुपये उकळले.
पिंपरी-चिंचवड: समाजात न्यायासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनीच एका पीडित महिलेचा विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण परिसरात उघडकीस आला आहे. कंपनीत होणाऱ्या मानसिक त्रासातून मुक्तता करण्याचे आणि न्याय मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन दोन महिला कार्यकर्त्यांनी एका ३८ वर्षीय महिलेला ७० हजार रुपयांचा गंडा घातला. इतकंच नव्हे, तर या महिलेला दोन दिवस बेकायदेशीरपणे डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार महिला एका कंपनीत कामाला असून तिथे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे त्या त्रस्त होत्या. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी चाकण भागातील दोन महिला सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. या कार्यकर्त्यांनी महिलेला न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ७० हजार रुपये उकळले. मात्र, काम करण्याऐवजी या दोन्ही संशयित आरोपींनी पीडित महिलेवरच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
advertisement
दोन दिवस डांबून ठेवले आणि धमकी दिली:
सप्टेंबर २०२४ पासून हा प्रकार सुरू होता. दरम्यान, २१ सप्टेंबर २०२५ रोजी या महिला कार्यकर्त्यांनी फिर्यादीला कोठेतरी डांबून ठेवले. तिथे तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत आणखी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. "जर पैसे दिले नाहीत, तर तुला कोठेतरी नेऊन टाकून देऊ," अशी थेट जिवे मारण्याची धमकीही या कार्यकर्त्यांनी दिली. या दबावामुळे आणि भीतीमुळे पीडित महिला अत्यंत तणावाखाली होती.
advertisement
अखेर या छळाला कंटाळून पीडित महिलेने सोमवारी (१५ डिसेंबर) चाकण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही महिला सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध खंडणी, फसवणूक आणि बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे 'सामाजिक कार्यकर्ता' या नावाखाली सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 17, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मदतीच्या बहाण्याने पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उकळले पैसे; मग डांबून ठेवत महिलेकडे धक्कादायक मागणी









