मला आई बनवा अन् 25 लाख मिळवा! घरबसल्या कमाईचा फंडा, ‘प्रेग्नन्सी जॉब’ने अनेकांना गंडा
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Pregnancy Scam: ‘मला आई व्हायचंय, त्यासाठी मदत करा, 25 लाख रुपये देईन’ असा संदेश पाठवून अनेक तरुणांना ‘प्रेग्नन्सी जॉब’च्या जाळ्यात अडकवलं जातंय.
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पुरुषांना भावनिक आणि आर्थिक आमिष दाखवून फसवणूक करण्याचा गंभीर प्रकार छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आला आहे. “मला आई व्हायचं आहे, त्यासाठी मदत करा, 25 लाख रुपये देईन” अशा आशयाचे संदेश पाठवून तरुणांना जाळ्यात ओढले जात असून, गेल्या महिनाभरात अशा किमान सहा प्रकरणांची नोंद सायबर पोलिस ठाण्यात झाली आहे.
सायबर चोरटे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आकर्षक महिलांचे फोटो वापरून बनावट प्रोफाइल तयार करतात. या प्रोफाइलमधून स्वतःला श्रीमंत, परदेशात राहणारी किंवा व्यावसायिक महिला असल्याचे भासवले जाते. “खूप दिवसांपासून अपत्य होत नाही, मला आई व्हायचं आहे,” असा भावनिक मजकूर पाठवून तरुणांशी संवाद सुरू केला जातो. त्यानंतर घरबसल्या कमाई किंवा तथाकथित ‘प्रेग्नन्सी जॉब’चे आमिष दाखवले जाते.
advertisement
प्रेग्नन्सी जॉबला फसला अकाउंटंट
या आमिषाला वाळूज परिसरातील एका खासगी कंपनीत काम करणारा 26 वर्षीय अकाउंटंट बळी पडला. त्याला ‘प्रेग्नन्सी जॉब’साठी नोंदणी आवश्यक असल्याचे सांगून आठ हजार रुपये भरायला लावण्यात आले. दरमहा 40 हजार रुपये पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र पैसे घेतल्यानंतर संबंधितांनी संपर्क बंद केला आणि फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
advertisement
स्पर्धा परीक्षा करणारा तरुण जाळ्यात
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील एका तरुणासोबत असाच प्रकार घडला. टेलिग्रामवरून पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून त्याच्याकडून 15 हजार रुपये नोंदणीच्या नावाखाली घेतले गेले. पैसे भरल्यानंतर कोणताही जॉब न देता संबंधितांना ब्लॉक करण्यात आले.
बदनामीची धमकी देऊन लूट
फसवणुकीच्या पुढील टप्प्यात निवडीच्या प्रक्रियेच्या नावाखाली तरुणांना व्हिडिओ कॉलवर बोलावले जाते. या कॉलदरम्यान अंगप्रदर्शन करून घेतले जाते आणि संपूर्ण संभाषणाचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले जाते. नंतर हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून बदनामीची धमकी दिली जाते. काही वेळा संबंधित तरुणाच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून त्याचे नातेवाईक, मित्र आणि सहकारी शोधून काढले जातात आणि त्यांना हे व्हिडिओ पाठवण्याची धमकी दिली जाते. समाजात बदनामी होईल या भीतीने अनेक तरुण पैसे देण्यास भाग पडतात.
advertisement
असे उकळतात पैसे
फसवणूक करताना सुरुवातीला रजिस्ट्रेशन फी, त्यानंतर ओळख पडताळणी शुल्क, जीएसटी, प्रोसेसिंग चार्ज, सिक्युरिटी डिपॉझिट आणि शेवटी कायदेशीर प्रक्रिया व वकिलांच्या शुल्काच्या नावाखाली वेगवेगळ्या टप्प्यांत रक्कम उकळली जाते. एकदा पैसे मिळाल्यानंतर आरोपी संबंधित नंबर आणि सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करतात.
पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, अनेक वेळा निरपराध तरुणींचे फोटो चोरून या बनावट प्रोफाइलसाठी वापरले जातात. अश्लील व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यासोबतच काही प्रकरणांत तरुणांना पुढील गुन्हेगारी कृत्यांमध्ये ओढण्याचाही प्रयत्न केला जातो.
advertisement
सायबर पोलिसांचे आवाहन
view commentsसायबर पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सांगितले की, सोशल मीडियावरून येणाऱ्या अशा कोणत्याही ऑफर्सना कोणताही कायदेशीर आधार नाही. आर्थिक, सामाजिक आणि लैंगिक भावनांचा गैरफायदा घेऊन ही फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा संदेशांना प्रतिसाद देऊ नये. फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करावी किंवा 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 17, 2025 10:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मला आई बनवा अन् 25 लाख मिळवा! घरबसल्या कमाईचा फंडा, ‘प्रेग्नन्सी जॉब’ने अनेकांना गंडा








