मालक पूजा करायला गेला, अन् वफादार बनले गद्दार, सगळ्यात मोठ्या चोरीने शहरात खळबळ!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
संपूर्ण कुटुंब पूजा करण्यात व्यस्त असताना, त्यांच्या घरात वर्षानुवर्षे काम करणारे निष्ठावंत नोकर प्रत्येक कोपरा 'साफ' करत होते.
संपूर्ण कुटुंब पूजा करण्यात व्यस्त असताना, त्यांच्या घरात वर्षानुवर्षे काम करणारे निष्ठावंत नोकर प्रत्येक कोपरा 'साफ' करत होते. ज्या घराचे रक्षण करायचे होते तिथून नोकर तब्बल 18 कोटी रुपयांच्या किंमतीचे दागिने घेऊन पळून गेले. ही शहरातील सगळ्यात मोठी घरफोडी मानली जात आहे.
ही घटना 25 जानेवारी रोजी घडली. बंगळुरूच्या मराठाहल्ली पोलीस स्टेशन परिसरातील यमालुरु परिसरात राहणारा 28 वर्षीय व्यापारी त्याच्या कुटुंबासह (आई आणि पत्नी) 'भूमीपूजन' समारंभाला उपस्थित राहण्यासाठी घराबाहेर पडला. त्याला कल्पनाही नव्हती की त्याची अनुपस्थिती एका सुनियोजित कटाचा भाग बनेल. घर रिकामे पाहून, घरकाम करणाऱ्या नोकरांनी त्यांच्या साथीदारांसह हा गुन्हा केला.
advertisement
18 कोटी रुपयांची चोरी
पोलिसांच्या मते, ही चोरी सुनियोजित होती. आरोपींनी लोखंडी रॉडने जमिनीवर आणि पहिल्या मजल्यावरील अनेक लॉकर फोडली. हे चोर अत्यंत धूर्त होते. त्यांना घराच्या सुरक्षा व्यवस्थेची पूर्ण माहिती होती. सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडावेत आणि त्यांचा कोणताही मागमूस रेकॉर्ड होऊ नये म्हणून त्यांनी चोरी करण्यापूर्वी वीजपुरवठा खंडित केल्याचा पोलिसांना संशय आहे.
advertisement
चोरांनी घरफोडीमध्ये सुमारे 11.5 किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिने, सुमारे 5 किलो चांदीचे दागिने, 11.5 लाख रुपये रोख चोरली. या वस्तूंची एकूण किंमत अंदाजे 18 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस एका नेपाळी जोडप्याचा शोध घेत आहेत.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की या चोरीमागील सूत्रधार घरात काम करणारे एक नेपाळी जोडपे आहे. त्यांना कुटुंबाच्या प्रत्येक हालचाली आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्याची माहिती होती. त्यांना कुटुंब कधी बाहेर जाणार आणि कधी परत येणार हे माहित होते. या विश्वासाचा फायदा घेत त्यांनी काही अज्ञात साथीदारांना बोलावले, गुन्हा केला आणि पळून गेले.
advertisement
गुन्हा दाखल
मराठाहल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता (BNS), 2023 च्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. आरोपींना पकडण्यासाठी आणि चोरीला गेलेला माल जप्त करण्यासाठी विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे.
Location :
Bangalore,Karnataka
First Published :
Jan 29, 2026 11:57 PM IST










