पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने जतन करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच शिवरायांशी संबंधित असणाऱ्या वस्तू आणि वास्तूंचेही संवर्धन केले जाते. सध्या देशभरात तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे. शिवरायांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यात त्यांच्या पायाचे आणि हाताचे ठसे आहेत. छत्रपती शिवरायांच्या या वारशाचे जतन करण्यासाठी पुण्यातील शिवप्रेमी तुषार भांबरे यांनी सोने आणि चांदी वापरून एक प्रतिकृती तयार केली आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील 350 किल्ल्यांवरील मातीही वापरण्यात आलीय.
advertisement
सोन्या-चांदीची प्रतिकृती
छत्रपती शिवाजी महाराजा यांनी समुद्रात सिंधुदुर्ग केल्ला बांधला. या किल्ल्यावर शिवरायांच्या पायाचे आणि हाताचे ठसे असल्याने त्याला वेगळं महत्त्व आहे. आजही हे ठसे याठिकाणी पाहायला मिळतात. पुण्यातील तुषार भांबरे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या ठशांची प्रतिकृती तयार केली आहे. तब्बल चार किलो चांदी आणि तीन तोळे सोने वापरून महाराजांच्या पायांच्या ठशांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
350 किल्ल्यांवरील मातीचा वापर
या सुवर्ण प्रतिकृतीत शिवकालीन चिन्हांचा वापर करण्यात आला आहे. 350 गडावरून माती गोळा करून ती महाराजांच्या चरणांखाली ठेवण्यात आलीय. तसेच या प्रतिकृतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वाक्षरी देखील सुवर्ण अक्षरात कोरलीय. महाराजांच्या कपाळावरील गंध, शिवकालीन होन हेही या प्रतिकृतीवर अंकीत आहे. तसेच हिंदू धर्मात महत्त्वाचे समजली जाणारी चिन्हे कमळ, गदा, त्रिशूल, चंद्र, जिरे टोप, तलवार, बिछवा, वाघनख, शिव मुद्रा, तोफ आदींच्या प्रतिकृती यावर पहायला मिळतात, अशी माहिती भांबरे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधित विविध गोष्टींचा समावेश या प्रतिकृतीत करण्यात आला आहे. त्यामुळे शिवभक्तांना 350 किल्ल्यांवरील माती आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवरायांच्या हात आणि पायाच्या ठशांचे दर्शन या प्रतिकृतीमुळे घेणे शक्य होणार असल्याचं भांबरे सांगतात.